नवी दिल्ली -टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू भारतात परतली. सोमवारी नवी दिल्लीत चानूचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळाबाहेर चानूच्या स्वागतासाठी मोठ मोठ्या हस्तींसह क्रीडा प्रेमींनी गर्दी केली होती.
मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये 87 आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो असे मिळून 202 किलो वजन उचलले. या गटात चीनच्या झाहुई हाउ हिने एकूण 210 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह कांस्य पदकाची मानकरी ठरली.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर मणीपूरचे मुख्यमंत्री ए. बीरेन सिंग यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मीराबाईशी संवाद साधला. यात त्यांनी तिचं अभिनंदन व कौतुक केलं. यासोबत चानूला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची देखील घोषणा केली. तसेच तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार सांगितलं. त्यानुसार मायदेशात परतताच मणीपूर सरकारने चानूची अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) या पदावर नियुक्ती केली.