मुंबई -भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, तापसी पन्नू, शाहीद कपूर आदींनी ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधुचे अभिनंदन केले. सिंधून टोक्योत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मान उंचावत कांस्यपदक जिंकले. तिच्या या कामगरीनंतर संपूर्ण देश तिच्यावर गर्व करत आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकत सिंधूने इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू बनली आहे.
पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक जिंकून दिले. महिला एकेरीत सिंधूने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिला 21-13, 21-15 असे नमवलं. दरम्यान, पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या ताय झू यिंगकडून पराभव पत्कारावा लागला. होता. सिंधूने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिकंले होते.
अक्षय कुमार काय म्हणाला?
अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करत सिंधूचे अभिनंदन केले. त्याने लिहिले आहे की, ''तू पुन्हा करुन दाखवलंस, #PVSindhu! काय फोकस आणि दृढनिश्चय. कांस्यपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन. #Tokyo2020 #Cheer4India,"
अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, सिंधूच्या तिच्या विजयाचा देशभरात आनंद साजरा केला पाहिजे. आपल्या मुलीने घरी कांस्यपदक आणले आहे. तीने करून दाखवलं. कम अप चॅम्प @Pvsindhu1. चला साजरा करूया.
बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली म्हणाले की, सिंधुच्या कामगिरीने देश गौरवान्वित झाला आहे. 1 महिला! 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदकं! 2 सलग ऑलिम्पिक! काय कामगिरी आहे. अभिनंदन @Pvsindhu1,".
दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता सुकुमारने सिंधूच्या विजयाचा फोटो ट्विट करत लिहिले की, "What a trailblazer! #PVSindhu,"
शाहीद कपूर म्हणाला की, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने पदक जिंकले. ही भारतासाठी अभिमानाची वेळ आहे.
अभिनेता वरुन धवन याने आपले वडील चित्रपट निर्माता, दिग्दर्शक डेविड धवन यांच्यासोबत सिंधूचा सामना पाहतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, पी. व्ही. सिंधूने पुन्हा करुन दाखवले. विश्वविजेती. असे त्याने आपल्या इन्टाग्राम स्टोरीवर लिहिले. यासोबतच अभिनेता अभिषेक बच्चन, सनी देओल, रणदीप हुडा, अभिनेत्री दिया मिर्झा यांनी ट्विट करत सिंधूचे अभिनंदन केले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूची कामगिरी -
रिओ ऑलिम्पिकधील रौप्य पदक विजेता पी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा हिच्याशी झाला. या सामन्यात सिंधूने 21-7, 21-10 अशी बाजी मारली. ग्रुप जे मध्ये दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर हाँगकाँगच्या च्युंग एनगान हिचे आव्हान होते. सिंधूने च्युंगचे आव्हान 21-9, 2-16 असे मोडत तिसरी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीत सिंधूचा सामना डेन्मार्कचा मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी झाला. तेव्हा सिंधूने हा सामना अवघ्या 41 मिनिटात 21-15, 21-13 अशा फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची गाठ जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी झाली. या सामन्यात सिंधूने 21-13, 22-20 ने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत चीनच्या ताय झू यिंगने सिंधूचा पराभव केला. ताय झू यिंगने हा सामना 21-18, 21-12 असा जिंकला.
भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील तिसरे पदक
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून भारताचे पदकाचे खाते उघडले होते. यात सिंधूने कांस्य पदकाच्या रुपाने भर घातली. आता भारताच्या नावे एक रौप्य आणि एक कांस्य पदक आहे. याशिवाय भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने एक पदक निश्चित केलं आहे.
कुस्तीपटू सुशील कुमार देशातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे ज्याने दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहे. यात 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकांचा समावेश आहे.