टोकियो - वयाच्या ज्या वळणावर इतर लोक निवृत्ती घेतात, अशा वयात कुवैतच्या अब्दुल्ला अल रशिदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत, वय हे केवळ आकड्यांपुरते आहे, हे जगाला दाखवून दिले. अब्दुल्ला यांनी नेमबाजीत ही किमया साधली आहे. तसेच त्यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा मनसुबा जाहीर केला.
अब्दुल्ला यांनी पुरूष स्कीटमध्ये कांस्य पदक जिंकले. पदकाला गवसणी घातल्यानंतर अब्दुल्ला म्हणाले की, 'मी 58 वर्षांचा सर्वात वयोवृद्ध नेमबाज आहे. हे कांस्य पदक माझ्यासाठी सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही. मी या कामगिरीवर खूश आहे. पण मला आशा आहे की, मी पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकेन.'
माझं दुर्दैव आहे की मी सुवर्ण जिंकू शकलो नाही. पण कांस्य पदकावर समाधानी आहे. देवाची इच्छा झाली तर मी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकेन. त्यावेळी माझं वय 61 असेल आणि मी स्कीट प्रकारामध्ये भाग घेईन, असेही अब्दुल्ला यांनी सांगितलं.
दरम्यान, अब्दुल्ला यांनी पहिल्यांदा 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलं. पण ते यावेळी स्वतंत्र खेळाडू म्हणून मैदानात उतरले होते. कुवैतला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बंदी घातली होती. यामुळे अब्दुल्ला आर्सन्ल फुटबॉल क्लबची जर्सी घालून मैदानात उतरले होते.
हेही वाचा -Tokyo Olympic : रौप्य पदक विजेती मीराबाई चानूला मायदेशी परतताच मिळालं सरकारकडून मोठं गिफ्ट
हेही वाचा -Tokyo Olympics : भारतीय पुरूष हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय