शांघाय -जर्मनीच्या युवा टेनिसपटू अॅलेक्झँडर ज्वेरेव आणि रूसचा डेनिल मेदवेदेव शांघाय मास्टर्स टेनिसच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आज उभे ठाकणार आहेत. जोकोविच आणि फेडरर आधीच स्पर्धेबाहेर पडल्यामुळे या दोन युवांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -शमीची मुलगी आयराचा डान्स पाहून नेटिझन्स फिदा; मुलीकडून डान्स शिकण्याच्या सल्ला
ज्वेरेवने उपांत्य सामन्यात इटलीच्या माटेओ बारेटिनीला मात दिली. त्याने ११ व्या सीडेड बारेटिनीला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. तर, तिसऱ्या सीडेड मेदवेदेवने सितसिपासला उपांत्य सामन्यात धूळ चारली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये मेदवेदेवने सितसिपासला ७-६(५), ७-५ असे हरवले. हे दोन्ही खेळाडू पाचव्यांदा आमने सामने आले होते.
आत्तापर्यंत ज्वेरेवने मेदवेदेवला चार वेळा हरवले आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या या युवा टेनिसपटूने फे़डररला ६-३, ६-७ (७), ६-३ असे हरवले होते. २०१४ आणि २०१७ मध्ये फेडररने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 'मेदवेदेव हा चांगला प्रतिस्पर्धी असून तो त्याच्या कारकिर्दीतील चांगले टेनिस खेळत आहे. त्याने मास्टर टूर्नामेंट सिनासिनाटीचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर लागोपाठ सहा स्पर्धांच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे जगातील तो उत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक आहे', असे ज्वेरेवने म्हटले आहे.