नवी दिल्ली - सर्बियाचा टेनिसस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचने अॅड्रिया टूर प्रदर्शन टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा त्यानेच आयोजित केली होती.
यापूर्वी, बल्गेरियाचा टेनिसपटू ग्रिगोर दिमित्रोव्ह, क्रोएशियाचा बार्ना कोरिक आणि व्हिक्टर ट्रॉकी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या खेळाडूंनीही अॅड्रिया टूर प्रदर्शन टेनिस स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. व्हिक्टर ट्रॉकीच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
जोकोविच आता 14 दिवस क्वारंटाईनन असणार आहे. त्याने या स्पर्धेदरम्यान संसर्ग झालेल्यांची माफी मागितली. तो म्हणाला, ''आम्ही बेलग्रेडला पोहोचलो त्या क्षणी आमची चाचणी झाली. मी जेलेना प्रमाणेच पॉझिटिव्ह आढळलो आहे, तर, मुलांची चाचणी नेगेटिव्ह आली आहे.''
तो पुढे म्हणाला, ''गेल्या महिन्यात आम्ही जे काही केले ते आम्ही अगदी मनापासून आणि प्रामाणिक हेतूने केले. आमची स्पर्धा एकता आणि करुणेचा संदेश देण्यासाठी होती. आम्ही व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धा आयोजित करण्याच्या अटी पूर्ण झाल्या आहेत असा विश्वास आम्हाला होता. दुर्दैवाने, हा विषाणू अजूनही अस्तित्त्वात आहे.''
बेलग्रेड येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे स्टेडियम प्रेक्षकांनी भरले होते. या कठीण काळात स्पर्धा घेण्याच्या निर्णयाबद्दल किर्गिओसने निराशा व्यक्त केली होती. स्पर्धेचा पुढील टप्पा आता रद्द करण्यात आला आहे. पुढचा टप्पा क्रोएशियाच्या जादर येथे होणार होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविच आणि आंद्रे रुबलेव एकमेकांसमोर उभे ठाकणार होते.