लंडन -जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला सार्बियाचा खेळाडू नोवाक जोकोव्हिचने इटलीच्या माटिओ बेरेट्टिनीचा पराभव करत सहाव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. माटिओने पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये जिंकला. त्यानंतर जोकोव्हिचने दबाब जुगारून खेळ करत पुढील तिन्ही सेट जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. जोकोव्हिचने अंतिम सामना ६-७ (४-७), ६-४, ६-४, ६-३ अशा फरकाने जिंकला. जोकोव्हिचचे हे विक्रमी २०वे विजेतेपद आहे. त्याने राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
- पहिला सेट
पहिला सेट दोन्ही खेळाडूंमध्ये खूपच रोमांचक राहिला. एकवेळ जोकोव्हिचने ५-२ अशी सोपी आघाडी मिळवली होती. परंतु बेरेट्टिनीने शानदार वापसी करत बाजी पलटवली. त्याने हा सेट ६-६ अशा बरोबरीत आणला. त्यानंतर त्याने ट्रायब्रेकरमध्ये बाजी मारत हा सेट ७-६ (७-४) असा आपल्या नावे केला.
- दुसरा सेट
दुसऱ्या सेटमध्ये देखील दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. जोकोव्हिचने पहिल्या सेट सारखी यात देखील ५-१ अशी आघाडी मिळवली. तेव्हा बेरेट्टिनीने शानदार वापसी करत हा सेट ५-४ अशा स्थिती आणला. पण यावेळी जोकोव्हिचने बेरेट्टिनीला संधी दिली नाही आणि हा सेट त्याने ६-४ अशा फरकाने आपल्या नावे केला.
- तिसरा सेट
तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने पहिल्या पासून आघाडी घेतली. त्याने ३-१ अशी आघाडी घेतली. तेव्हा बेरेट्टिनीने वापसी करण्याचा प्रयत्न करत ४-३ अशी स्थिती निर्माण केली. परंतु, जोकोव्हिचने अनुभव पणाला लावत हा सेट देखील ६-४ अशा फरकाने जिंकला.
- चौथा सेट
बेरेट्टिनीला चौथ्या सेट कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार होता. त्याने जोकोव्हिचला कडवी झुंज दिली. एक वेळ सामना ३-३ अशा बरोबरीत होता. परंतु गतविजेत्या जोकोव्हिचने युवा बेरेट्टिनीला उलटफेर करण्याची संधीच दिली नाही. त्याने हा सेट ६-३ असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली.