महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नोवाक जोकोव्हिचची Wimbledon २०२१ मध्ये विजयी घोडदौड कायम - निक किर्गिऑस

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दक्षिण आफ्रिकेचा टेनिसपटू केविन अँडरसन याचा ६-३, ६-३, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Wimbledon 2021 : novak djokovic, Nick Kyrgios enter 3rd round in Wimbledon
Wimbledon 2021 : नोवाक जोकोव्हिचची विजयी घोडदौड कायम

By

Published : Jun 30, 2021, 8:54 PM IST

Updated : Jun 30, 2021, 9:20 PM IST

लंडन - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सहज विजय मिळवला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा टेनिसपटू केविन अँडरसन याचा ६-३, ६-३, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत थाटात तिसरी फेरी गाठली.

नोवाक जोकोव्हिचने केविन अँडरसनला एकही सेट जिंकू दिला नाही. त्याने पहिल्या सेटपासून आपला धडाका कायम ठेवला आणि सामना ६-३, ६-३, ६-३ अशा फरकाने एकतर्फा जिंकला. दरम्यान, जोकोव्हिचने पहिल्या फेरीत इंग्लंडच्या जॅक ड्रापर याचा पराभव केला होता. त्याने ड्रापरविरुद्धचा पहिला सामना ४-६, ६-१, ६-२, ६-२ अशा फरकाने जिंकला होता.

नोवाक जोकोव्हिचच्या नावे १९ ग्रँडस्लॅम आहेत. त्याच्यापुढे स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर हे दोघेच आहेत. या दोघांच्या नावे प्रत्येकी २०-२० ग्रँडस्लॅम आहेत. जोकोव्हिच यंदाचे विम्बल्डन जिंकून या दोघांशी बरोबरी साधण्याचा प्रयत्नात आहे.

निक किर्गिऑसचा संघर्षपूर्ण विजय

ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गिऑस याला दुसऱ्या फेरीत फ्रेंचचा युवा खेळाडू उगो हम्बर्ट याने कडवी झुंज दिली. पाच सेटमध्ये रंगलेल्या या सामन्यात निकने ६-४, ४-६, ३-६, ६-१, ९-७ अशा फरकाने बाजी मारली. पहिला सेट गमावल्यानंतर उगो हम्बर्ट याने आपला खेळ उंचावत पुढील दोन्ही सेट जिंकले. तेव्हा निकने चौथा सेट एकतर्फा जिंकत सामना बरोबरीत आणला. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ केला. परंतु निक याने हा सेट ९-७ अशा फरकाने जिंकत सामन्यावर नाव कोरले.

राफेल नदालची माघार

फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत राफेल नदालचा पराभव नोवाक जोकोव्हिचने केला होता. त्यानंतर राफेल नदाल याने विश्रांतीचे कारण पुढे करत टोकियो ऑलिम्पिक आणि विम्बल्डनमधून माघार घेतली. पण रॉजर फेडरर विम्बल्डनमध्ये खेळत आहे. फेडरर दुखापतीतून सावरल्यानंतर ग्रास कोर्टवर उतरला आहे.

हेही वाचा -Wimbledon २०२१ : अश्ले बार्टी, व्हिनस, फेडरर आणि झ्वेरेव्हची सलामी; सेरेनाला धक्का

हेही वाचा -विम्बल्डनमध्ये एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, प्रेक्षकांनी उभे राहून केला टाळ्याचा कडकडाट

Last Updated : Jun 30, 2021, 9:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details