लंडन - अग्रमानांकित अॅश्ले बार्टीने विम्बल्डन २०२१ सालच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा पराभव करत विजेतेपद पटकावले. बार्टीने अंतिम सामन्यात कॅरोलिनाचा ६-३, ६-७ (४-७) ६-३ असा पराभव केला. विम्बल्डनला बार्टीच्या रुपाने नवा विजेता मिळाला. तर दुसरीकडे कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
अॅश्ले बार्टीने २०१८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर तिला ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. पण तिने विम्बल्डन जिंकत दुसरे ग्रँडस्लॅम मिळवले. ती इव्होनी कावली यांच्यानंतर विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू बनली आहे.
अॅश्ले बार्टीने अंतिम सामन्यात कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा पहिला सेटमध्ये ६-३ ने धुव्वा उडवला. त्यानंतर कॅरोलिना हिने दुसऱ्या सेटमध्ये कडवी झुंज दिली. तिने हा सेट ट्रायब्रेकरमध्ये ७-६ (७-४) असा जिंकत सामना बरोबरीत आणला. पण बार्टीने तिसऱ्या सेटमध्ये कॅरिलोनाचा कडवा प्रतिकार मोडीत काढत तिसरा सेट ६-३ असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली.