लंडन - 'न भूतो न भविष्यति' असा ठरलेला रविवार वर्ल्डकप आणि विम्बल्डनच्या अंतिम सामन्याने चांगलाच लक्षात राहिला. यजमान इंग्लंडने अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. तर, अव्वल मानांकित जोकोव्हिचने दुसऱ्या मानांकित फेडररला ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) असे पराभूत केले.
विम्बल्डन स्पर्धा : रोमांचक सामन्यात रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव; जोकोव्हिच झाला 'किंग' - championships
सार्बियाचा खेळाडू नोवाक जोकोव्हिच आणि स्वित्झर्लंडचा खेळाडू रॉजर फेडरर यांच्यामध्ये हा अंतिम सामना झाला.
या चित्तथरारक लढतीमध्ये सर्बियाच्या जोकोव्हिचने सुपर टायब्रेकरमध्ये दाखवलेल्या शांत खेळामुळे विजय साध्य करता आला. ही लढत तब्बल चार तास आणि ५५ मिनिटे रंगली होती. जोकोव्हिचने पहिला सेट जिंकून दमदार सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र, फेडररने जोकोव्हिचचे आव्हान परतून लावले. तिसऱ्या सेटमध्ये या दोन्ही खेळांडूमध्ये झुंज पाहायला मिळाली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेला होता. परंतु येथेही जोकोव्हिचने ७-४ अशा फरकाने सरशी साधली. चौथ्या सेटमध्ये बॅकबँडच्या फटक्यांचा अफलातून मारा करत फेडररने परत सामना समान पातळीवर आणून ठेवला.
पाचव्या आणि विजेता ठरवणाऱया या सेटमध्ये दोघांनी कडवा प्रतिकार केला. कधी जोकोव्हिच तर कधी फेडरर अशा अवस्थेत असणाऱ्या या सेटने चाहत्यांची मने जिंकली. सुरुवातीला आघाडी घेणाऱया जोकोव्हिचवर फेडररने परत एकदा समान सरशी साधली. १२-१२ अशा अवस्थेत सामना पोहचल्यानंतर सुपर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला आणि त्यामध्ये जोकोव्हिचने बाजी मारत पाचवे विम्बल्डन विजेतेपद पटकावले.