पॅरिस - यंदाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेची विजेती आणि जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ओसाकाने २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ओसाकाने ट्विटरवर ही माहिती दिली.
२२ वर्षीय ओसाका म्हणाली, "दुर्दैवाने मी यावर्षी फ्रेंच ओपन खेळू शकणार नाही. माझे हॅमस्ट्रिंग अद्याप सुजलेले आहे, त्यामुळे माझ्याकडे फ्रेंच ओपनसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. या दोन्ही स्पर्धा खूप लवकर आयोजित केल्या गेल्या आहेत. आयोजक आणि खेळाडूंना मी शुभेच्छा देते."
ओसाकापूर्वी, जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या अॅश्ले बार्टीने आपले नाव फ्रेंच ओपनमधून मागे घेतले आहे. आरोग्याच्या समस्या आणि तयारीची कमतरता सांगत, तिने आपले नाव मागे घेतले. बार्टी फेब्रुवारीपासून कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही. शिवाय, कोरोनामुळे तिने यूएस ओपन स्पर्धेतही भाग घेतला नव्हता.
२४ वर्षीय बार्टीने गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात मार्केटा वोंद्रुसोवाचा पराभव करून आपले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. यावर्षी ती युरोपमध्ये खेळणार नसल्याचे तिने सांगितले होते. फ्रेंच ओपनची सुरुवात मे महिन्यात होणार होती. पण कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. २७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.