न्यूयॉर्क - जापानची नाओमी ओसाका हिने यूएस ओपन महिला सिंगलचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका हिचा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये पिछाडीनंतर तिने सामन्यात जबरदस्त वापसी करत विजय मिळवला. ओसाकाने अझारेंकाला १-६, ६-३, ६-३ असे नमवले.
यूएस ओपनच्या महिला सिंगलचा अंतिम सामना यूएसटीए बिली किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या कोर्टवर खेळवण्यात आला. या सामन्यात २२ वर्षीय ओसाकाने बाजी मारत कारकिर्दीतील दुसरे यूएस ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ओसाकाचे हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
अझारेंकाने पहिल्या सेटमध्ये दमदार सुरुवात करत पहिला सेट १-६ ने जिंकला. अझारेंकाच्या झंझावतीसमोर ओसाकाचा पहिल्या सेटमध्ये निभाव लागला नाही. पण तिने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि तिने दुसरा सेट ६-३ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. हाच झंझावत तिने अखेरच्या सेटमध्ये देखील कायम राखली. अखेरचा निर्णायक सेट देखील तिने ६-३ असा जिंकत ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले.