न्यूयॉर्क - वर्षाअखेरीची ग्रँडस्लॅम स्पर्धा अशी ओळख असलेल्या यूएस ओपनला तब्बल सहा वर्षांनंतर नवा विजेता मिळाला. ऑस्ट्रीयाच्या डॉमिनिक थीमने विजेतेपद पटकावले. त्याने संघर्षपूर्ण ठरलेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. थीमने हा सामना २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ (६) असा जिंकत पहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली.
यूएस ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचक ठरला. पहिला सेट जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने २-६ अशा फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेटमध्ये देखील अलेक्झांडर अग्रेसर ठरला. त्याने दुसरा सेटही ४-६ अशा फरकाने जिंकला. पहिल्यांदाच यूएस ओपनची अंतिम फेरी गाठणारा अलेक्झांडर विजेता ठरणार, असे वाटत असताना, तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ग्रँडस्लॅम उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिलेला थीमने तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. त्याने तिसरा सेट ६-४ च्या फरकाने जिंकला.