रिओ डी जानेरो -ब्राझील येथे सुरु असलेल्या कॅम्पिनास चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागलचा पराभव झाला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाच्या जुआन पाब्लो फिकोविचने सुमितचा ६-४, ६-१ ने पराभव केला. नुकत्याच झालेल्या ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या जेतेपदावर सुमितने आपले नाव कोरले होते.
हेही वाचा -फिरकीपटू अश्विनचा मोठा प्रताप!..कसोटीत केला 'हा' खास विक्रम
जागतिक क्रमवारीत १३५ व्या स्थानी असलेल्या सुमितने सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये चांगला खेळ केला होता. मात्र, अंतिम क्षणी फिकोविचने आपला खेळ उंचावला आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर, फिकोविचने सुमितला दुसऱ्या सेटमध्ये संधीच दिली नाही. जागतिक क्रमवारीत ३२५ व्या स्थानी असलेल्या फिकोविचने आक्रमक फटके खेळत हा सेट ६-१ ने जिंकला.
२२ वर्षाच्या सुमितने यंदाच्या ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. दक्षिण अमेरिकेन क्लेवर असा पराक्रम करणारा सुमित हा पहिलाच टेनिसपटू ठरला. या स्पर्धेत सातव्या सीडेड सुमितने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या फाकुंडो बॅग्निसला ६-४, ६-२ असे हरवले. या विजेतेपदामुळे जागतिक क्रमवारीतही सुमितला फायदा झाला आहे. १५९ व्या स्थानावरून सुमितने १३५ व्या स्थानी उडी घेतली होती.