नवी दिल्ली -नुकत्याच झालेल्या बांजा लूका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा टेनिसपटू सुमित नागलचा पराभव झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणाऱया सुमितने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान गाठले आहे.
हेही वाचा -यंदाच्या अॅशेस मालिकेतील स्मिथचे हे विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
सोमवारी एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सुमितने १५९ वे स्थान गाठले आहे. २२ वर्षीय सुमितला बांजा लूका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेदरलँडच्या टालोंन ग्रीकस्पूरने हरवले. या सामन्यावेळी सुमित १७४ व्या स्थानावर होता. टालोंनने सुमितचा २-६, ३-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत जेतेपद पटकावले.
दरम्यान, सप्टेंबर २०१७ मध्ये बंगळुरु ओपननंतर सुमितने पहिल्यांदाच एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. २२ वर्षीय सुमितने मागील महिन्यात झालेल्या यूएस ओपन स्पर्धेत रॉजर फेडरर विरुध्द पहिल्या सेट जिंकला होता. मात्र, त्यानंतर फेडररने त्याला आपल्या अनुभवाच्या जोरावर पराभूत केले होते.
भारताच्या फक्त प्रज्ञेश गुणेश्वरनने अव्वल १०० जणांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रज्ञेश ८२ व्या स्थानी आहे. रामकुमार रामनाथनला तीन स्थानांचा फटका पडला आहे. तो १७९ व्या स्थानी आहे. पुरुषांच्या दुहेरीत रोहन बोपण्णा आणि दिविज शरण अनुक्रमे ४३ आणि ४९ स्थानावर आहेत. तर, लिएंडर पेसने एका स्थानाची आगेकुच करत ७८ वे स्थान गाठले आहे.