लंडन - टेनिस खेळातील प्रसिद्ध स्पर्धा विम्बल्डनमध्ये प्रेक्षक उभे राहून टाळी वाजवताना एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या महिलेसाठी ते टाळ्या वाजवत आहेत. ती महिला एकदम शांत चित्ताने पाहत आहे. दरम्यान, ही महिला कोण? असा प्रश्न नक्कीच व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना पडला असेल. त्या महिलेचे नाव आहे सारा गिल्बर्ट. प्रसिद्ध साथरोगतज्ज्ञ. त्यांनीच ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार केली आहे.
विम्बलडनच्या आयोजकांनी या वर्षीच्या सुरूवातीचा सामना पाहण्यासाठी एनएचएस स्टाफ आणि कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करणाऱ्या डेव्हलपर्स यांना निमंत्रण दिले होते. त्यांची व्यवस्था खास व्हिआयपी बॉक्समध्ये करण्यात आली होती. या दरम्यान, इंग्लंडच्या प्रसिद्ध प्राध्यापिका सारा गिल्बर्ट देखील सामना पाहण्यासाठी पोहोचल्या. गतविजेता नोवाक जोकोव्हिचने १९ वर्षीय खेळाडू जॅक ड्रापर याच्याविरोधात सर्विस करण्याच्या तयारीत होता. तेव्हा आयोजकाकडून एक अनाउसमेंट करण्यात आली.
या अनाउसमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की, आज रॉयल बॉक्समध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारे डेव्हलपर्स आणि नॅशनल हेल्थ सर्विसचे लोक बसले आहेत. ही अनासमेंट ऐकून मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी टाळी वाजवत त्या सर्वांचे आभार मानले. जवळपास १ मिनिटापर्यंत मैदानावर टाळ्याचा कडकडाट सुरू होता. सामन्याचे समालोचन करणारे बोसिर बेकर यांनी सांगितलं की, स्पर्धेला सुरूवात करण्याआधी हा खूप क्षण भावूक क्षण होता.
दरम्यान, मागील वर्षी कोरोनामुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली होती. या वर्षी पुन्हा ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कोरोना वॉरियर्संना बोलावून आयोजकांनी त्यांचा सन्मान केला.