माद्रिद - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या राफेल नदालने फेलिसियानो लोपेज याच्या साथीने स्पेनला डेव्हिस चषक जिंकून दिला. अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा २-० ने पराभव केला. नदालने चौथ्यांदा डेव्हिस चषक जिंकला आहे. यापूर्वी स्पेनने नदालच्या नेतृत्वात २००४, २००९ आणि २०११ मध्ये डेव्हिस चषक जिंकला होता. तर स्पेनचे हे सहावे डेव्हिस चषक जेतेपद आहे.
३३ वर्षीय नदालने डेव्हिस चषक स्पर्धेतील सर्व ८ सामने जिंकले. अंतिम फेरीत नदालने कॅनडाचा डेनिस शापोवालोव याचा ६-३, ७-६(७) ने पराभव करत जेतेपद पटकावले.
शनिवारी एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या लोपेजला काईल एडमंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र नदालने इवान्सला पराभूत करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात नदाल- लोपेज जोडीने जेमी मरे व नीतल स्कुपस्की यांच्यावर ७-६, ७-६ असा विजय मिळवला होता.