न्यूयॉर्क - टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्सने पुढील आठवड्यापासून सुरूवात होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. याची माहिती सेरेनाने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दरम्यान, सेरेनाच्या पायाला दुखापत झाली होती. ती अद्याप यातून पूर्णपणे सावरलेली नाही. याच कारणाने तिने यूएस ओपन मधून देखील माघार घेतली आहे.
सहा वेळची यूएस ओपन विजेती सेरेना विल्यम्स विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. 39 वर्षीय सेरेना 24व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या शोधात आहे. पण सद्या तिला दुखापतीमुळे बेजार केले आहे. तिने याआधी दुखापतीमुळे टोकियो ऑलिम्पिक आणि सिनसिनाटी ओपनमधून माघार घेतली होती.
सेरेना विल्यम्सने इंन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. यात ती म्हणते की, डॉक्टर्स तसेच आरोग्य टीमशी चर्चा केल्यानंतर, दुखापत पूर्णपणे ठीक होण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे मी यूएस ओपनमधून माघार घेत आहे.