मुंबई- भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या लग्नाला रविवारी दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. दोघांनी १२ एप्रिल २०१० ला हैदरामध्ये लग्न केले. दहा वर्ष पूर्ण झाल्याने, सानियाने पती शोएबला लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोशल मीडियावर लग्नातील दोन फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टला तिने 'अपेक्षा विरुद्ध वास्तव' असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
सानियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत दोघेही आनंदी पाहायला मिळत आहेत. पण दुसऱ्या फोटोत सानिया आनंदी तर शोएब हैरान झालेला आहे. कारण सानियाने शोएबचे कान पकडले आहे. सानियाने हे फोटो शेअर करताना 'Happy Anniversary शोएब' असे म्हटले आहे.
सानिया-शोएबला ३० ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली आणि दोघांनी त्याचे नाव इजहान मिर्झा मलिक असे ठेवले आहे. दरम्यान, सानियाने कोरोना लढ्यात मदत गोळा करत आपले सामाजिक भान जपले आहे. तिने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. ती म्हणते की, 'गरजूंना सहायता करण्यासाठी, एक टीमच्या माध्यमातून प्रयत्न केला. यात आम्ही हजारो लोकांना जेवण दिलं. याबरोबर आम्ही १.२५ करोड इतकी रक्कम जमवली. जी किमान एक लाख लोकांसाठी उपयोगी ठरेल. हा एक छोटासा प्रयत्न होता. आपल्याला एकजूट होऊन अशा गोष्टी कराव्या लागणार आहेत.'