नवी दिल्ली -महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरली. सानियाला इंडोनेशियाच्या प्रिस्का मेडेलिन न्यूग्रोहोसह एशिया / ओशिनिया विभागातून नामांकन देण्यात आले.
सानिया म्हणाली, "फेड कप हार्ट पुरस्कार जिंकणे हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे. मी हा पुरस्कार माझ्या देशाला, माझ्या चाहत्यांना समर्पित करते. ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांचे आभार."
सानियाला पुरस्कारासोबत 2,000 डॉलर्स देखील मिळाले आहेत. हा निधी चॅरिटीमध्ये जाणार आहे. सानियाने ही रक्कम कोरोना निधीमध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. "कोरोना व्हायरसच्या या कठीण परिस्थितीत मला मिळालेली बक्षीस रक्कम तेलंगाणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला देत आहे", असे सानियाने सांगितले.
आपल्या मुलाच्या जन्मानंतर टेनिस कोर्टात परतलेल्या सानियाने या वर्षाच्या सुरूवातीस होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. फेड चषक प्लेऑफमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.