पॅरिस -फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णाचा पराभव झाल्याने भारतीय आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरीत कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हसह रोहन या स्पर्धेत खेळत होता. मात्र, पहिल्या फेरीत कॅनडाच्या वासेक पोसपिसिल आणि अमेरिकेचा जेस सॉक या जोडीने त्यांचा ६-२, ६-२ असा फडशा पाडला.
तत्पूर्वी, भारतीय खेळाडू दिविज शरण आणि त्याचा दक्षिण कोरियाचा सहकारी क्वोन सून वू या जोडीला बुधवारी क्रोएशियाच्या फ्रँको स्कुगोर आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रिझिक यांच्याकडून २-६, ६-४, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.
महिलांमध्ये दोन वेळा विम्बल्डन चॅम्पियन आणि सातव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाने या स्पर्धेच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला. तिने इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. आठव्या मानांकित आर्यना सबालेन्काने डारिया कास्तकिनाला पराभूत केले.
तर, जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविच फ्रेंच ओपनच्या तिसर्या फेरीत पोहोचला आहे. सर्बियाच्या या खेळाडूने सरळ सेटमध्ये लिथुआनियाच्या रिकॅड्रेस बेरेनकीसचा पराभव केला. गुरुवारी झालेल्या या सामन्यात जोकोविचने बेरेनकीसचा ६-१, ६-२, ६-२ असा पराभव केला. हा सामना एक तास २३ मिनिटे चालला.