नवी दिल्ली -स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर येत्या मार्चमध्ये टेनिस कोर्टात परतणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर फेडरर आपल्या दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. मागील वर्षभरापासून फेडररने व्यावसायिक टेनिस खेळलेले नाही.
पुढच्या महिन्यात कतार येथे होणाऱ्या दोहा ओपन स्पर्धेसाठी फेडरर सराव करत आहे. ८ ते १३ मार्चदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. छोट्या स्पर्धांना प्राधान्य देणार आहे, जेणेकरून चर्चेत न राहता तणावापासून दूर राहता येईल, असे २० ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या फेडररने सांगितले.
गेल्या वर्षी जानेवारीत फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तो नोवाक जोकोविचकडून पराभूत झाला. यंदा विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक आणि यूएस ओपन खेळणे ही फेडररची मुख्य उद्दीष्टे आहेत.
तत्पूर्वी, फेडररने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतली आहे. यंदा फेडरर मेलबर्नला येणार नसल्याचे ऑस्ट्रेलियन ओपनचे संचालक क्रेग टिले यांनी सांगितले. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदानेही दुखापतीमुळे एटीपी चषकातून माघार घेतली आहे.
हेही वाचा - द्रविडच्या 'त्या' फोन कॉलमुळे अजिंक्यचे पालटले आयुष्य