नवी दिल्ली -टेनिसचा महानायक म्हणून ख्याती असलेल्या रॉजर फेडररला यूएस ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का मिळाला आहे. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने पाच सेटच्या थरारक सामन्यात फेडररचा पराभव केला.
हेही वाचा -शिखर धवनचे नवीन 'टॅलेंट' जगासमोर, चाहते म्हणाले 'सुपर'
तिसऱ्या मानांकित फेडररला दिमित्रोव्हने ६-३, ४-६, ६-३, ४-६, २-६ असे हरवले. या सामन्यात ३८ वर्षीय फेडररचे पारडे जड मानले जात होते. मात्र, दिमित्रोव्हने सुरेख खेळ करत फे़डररवर कुरघोडी केली. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचने या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा फेडररवर लागल्या होत्या. मात्र, त्याआधीच तो स्पर्धेबाहेर पडला आहे.
जगज्जेत्या ओसाकाला पराभवाचा धक्का -
महिलांमध्ये अव्वल मानली जाणारी जपानची नाओमी ओसाका हिला यूएस ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिला पराभव स्विकारावा लागला. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिक हिने नाओमीला ७-५, ६-४ असे हरवले. दीड तास रंगलेल्या या सामन्यात बेलिंडाने नाओमीला सहज हरवले. बेलिंडाला उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या २३व्या मानांकित डॉना वेकिकशी लढत द्यावी लागणार आहे. या वर्षात बेलिंडाने नाओमीला तिसऱ्यांदा हरवले आहे.