न्यूयॉर्क -गतविजेता टेनिसपटू राफेल नदालने यंदाच्या यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. या निर्णयामुळे त्याने रॉजर फेडररच्या ग्रँडस्लॅम विक्रमाला मागे टाकण्याच्या आपल्या दाव्यांनाही ब्रेक दिला आहे. "जगभरात परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे, कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. या व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही", असे नदालने सांगितले.
यापूर्वी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अॅश्ले बार्टीनेही यूएस ओपन खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. तर, निक किर्गिओसनेही या स्पर्धेत भाग न घेण्याची घोषणा केली होती. ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.