नवी दिल्ली -स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजय घोडदौड सुरू ठेवली आहे. नदालने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने दुसर्या फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या फेडरिको देल्बोनिसला हरवले.
हेही वाचा -VIDEO : पराभवाचा वचपा काढणार का? विराटने 'हे' उत्तर देत जिंकली मनं
या सामन्यादरम्यान, एक रंजक किस्सा घडला. देल्बोनिसविरूद्ध परतीचा फटका खेळताना नदालचा चेंडू तिथे उभ्या असलेल्या अनिता बिर्चाल नावाच्या 'बॉल गर्ल'ला लागला. त्यानंतर लगेचच नदालने अनिताची विचारपूस केली. या दोघांच्या संभाषणादरम्यानचा 'क्युट' व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नदालने या छोट्या अनितासोबत सामन्यानंतर एक फोटोही काढला.
'नदाल माझा आवडता टेनिसपटू आहे. आणि मला आशा आहे की तो ही स्पर्धा जिंकेल', असे अनिताने मुलाखतीदरम्यान सांगितले.
नदालने देल्बोनिसवर ६-३, ७-६, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. नदालने या सामन्यात तब्बल २० वेळा देल्बोनिसची सर्व्हिस मोडण्याची संधी निर्माण केली. आता त्याचा तिसर्या फेरीत स्पेनच्याच पाब्लो कॅरेनो बुस्ताशी सामना होईल.