मेलबर्न - सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोव्हिचने रशियाच्या डेनिल मेदवेदेवचा अंतिम सामन्यात पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. जोकोव्हिच एकूण नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावण्याचा कारनामा केला आहे. या विजेतेपदासह त्याने राफेल नदाल आणि रॉजर फेडररच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाकडे एक पाऊल टाकले आहे.
पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याच्या यादीत सध्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे संयुक्तीक पहिल्या क्रमाकावर आहे. दोघांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जिंकली आहे. जोकोव्हिचने या दोघापाठोपाठ १८ ग्रँडस्लॅम जिंकली आहेत. आता जोकोव्हिच आणि फेडरर व नदालमध्ये केवळ २ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा फरक आहे.
नोवाक जोकोव्हिच 'मेलबर्न पार्कचा राजा'
जोकोव्हिचने ९ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यात त्याने अजिंक्य राहत ९ वेळा जेतेपद पटकावले. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना कधीही पराभूत न होण्याचा आपला विक्रम कायम ठेवला. याआधी त्याने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९ आणि २०२० साली ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.