बार्सिलोना - स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदाल याने त्याचे 'किंग ऑफ क्ले कोर्ट' हे बिरूद सार्थ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. नदालने बार्सिलोना ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टेफानोस सिटसिपास याचा ६-४, ६-७, ७-५ ने पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासातील नदालचे हे १२वे विजेतेपद ठरले.
नदाल आणि सिटसिपास यांच्यातील सामना रोमांचक ठरला. तब्बल तीन तास ३८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात नदालने बाजी मारली. हा सामना एटीपीच्या अंतिम सामन्यात सर्वात जास्त वेळ लांबलेला तिसरा सामना आहे. पहिला सेट नदालने ६-४ ने एकतर्फा जिंकला. यानंतर सिटसिपासने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि हा सेट ७-६ ने जिंकला. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये नदालने ७-५ अशी बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरलं.