पॅरीस -क्ले कोर्टचा बादशाह आणि ११ वेळचा फ्रेंच ओपन चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डोमॅनिक थीमवर ६-३, ५-७, ६-१, ६-१ ने मात करत विक्रमी बाराव्यावेळी फ्रेंच ओपनचा किताब जिंकला आहे. गतवर्षीही नदालने डोमॅनिक थीमवर मात करून फ्रेंच ओपन जिंकले होते. यंदा थीम नदालला पराभव करून गेल्या वेळचा वचपा काढेल अशी आशा होती मात्र नदालने थीमला जमू दिले नाही. नदालचा हा एकूण १८ वा ग्रॅडस्लॅम आहे. सध्या तो स्वीस स्टार आणि टेनिसचा बेताज बादशाह रॉजर फेडररच्या २० ग्रॅडस्लॅमनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर सर्बियाच्या नोवाक जोकोविच १५ ग्रॅडस्लॅमसह तिसऱ्या स्थानी आहे.
नदालने पहिला सेट ६-३ ने खिशात घातला. पहिल्या सेटमध्ये १-१ असा स्कोर असताना थीमकडे नदालची सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी होती, मात्र नदालने अनुभवाच्या जोरावर हा सेट जिंकला. त्यानंतर नदालने थीमची सर्व्हिस ब्रेक करत सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सर्व्हिस जिंकत सेट ६-३ ने खिशात घातला.
दुसऱ्या सेटमध्ये नदाल आणि थीम यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सेटमध्ये दोघांनीही जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. थीम १८० च्या गतीने सर्व्हिस करत होता. थीमने पूर्ण ताकदीने खेळ केला. दुसरा सेट ५-५ असा बरोबरीत असताना त्यानंतर थीम आपली सर्व्हिस जिंकत ६-५ केले. अखेर नदालची सर्व्हिस तोडत दुसरा सेट ५-७ ने जिंकून सामना १-१ ने बरोबरीत आणले.
तिसऱ्या सेटमध्ये नदालने थीमची पहिलीच सर्व्हिस ब्रेस केली. आणि तिसऱ्या सेटमध्ये २-० अशी आघाडी घेतली. थीमची दुसरी सर्व्हिसही नदालने ब्रेक करत ४-० अशी आघाडी घेतली. अखेर तिसरा सेट नदालने ६-१ ने जिकंत सामन्यात २-१ ने आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये नदालने थीमची पहिली सर्व्हिस ब्रेक करून सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचला. चौथ्या सेटमध्ये नदाल ३-० ने पुढे होता. या सेटमध्ये थीमचा दुसरा सेटही ब्रेक करण्याची संधी होती, मात्र थीमने जोरदार खेळाचे प्रदर्शन करत दुसरा सेट जिंकला. या सेटमध्ये नदालने थीमची दोन सर्व्हिस ब्रेक करून जवळपास सामना जिंकण्याचा जवळ पोहोचला. अखेर चौथा सेट ६-१ ने जिंकत सामना ६-३, ५-७, ६-१, ६-१ ने जिंकला.