नवी दिल्ली -भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस ग्रँडस्लॅम स्पर्धेत शतक ठोकण्यापासून अवघ्या तीन स्पर्धा दूर आहे. परंतु कोरोनामुळे या प्रवासाबद्दल अनिश्चितता कायम आहे. आपल्या कारकिर्दीत 18 ग्रँडस्लॅम जेतेपेदे मिळवणारा पेस टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास उत्सुक आहे.
2020 हे कारकिर्दीतील शेवटचे वर्ष असेल आणि आठव्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळताना निवृत्त होईन, असे पेसने मागील वर्षी सांगितले होते. मात्र, कोरोनामुळे यंदाचे ऑलिम्पिक एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
एका कार्यक्रमात पेस म्हणाला, “ऑलिम्पिकमध्ये अजून बराच वेळ बाकी आहे. टेनिस स्पर्धा जुलै किंवा ऑगस्टपर्यंत सुरू होतील, असे मला वाटत नाही. या स्पर्धा कदाचित ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सुरू होतील. आत्ता कोणालाही काहीही माहिती नाही. लॉकडाऊन उघडल्यावर आम्ही त्याचे मूल्यांकन करू आणि 2021 मध्ये खेळायचे की नाही हे ठरवू.''
पेस 17 जूनला 47 वर्षांचा होणार आहे. त्याने 100 व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेबाबत मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'मी 97 ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळल्या आहेत. मी आणखी तीन खेळल्या तर, त्या 100 होतील. याबद्दल विचार केला, तर मी खेळ चालू ठेवण्यासाठी प्रवृत्त होतो. याव्यतिरिक्त मला आठव्यांदा ऑलिम्पिकमध्ये जायला आवडेल. जेणेकरून सर्वात जास्त वेळा ऑलिम्पिकमध्ये खेळलेला खेळाडू हा भारतीय असेल.''