नवी दिल्ली - ध्येयाने झपाटलेला माणूस काहीही करु शकतो. मग ते कोणतेही क्षेत्र असो. महिलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर भारताची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम हिने लग्नानंतर परत एकदा मैदानात पाऊल ठेवत इतिहास घडवला होता. आता त्याच प्रमाणे टेनिसविश्वातील अव्वल महिला खेळाडू जिने याआधी दोनवेळा निवृत्ती स्विकारली होती ती टेनिस स्टार किम क्लाइस्टर्सने मैदानात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -यूएस ओपनमधील पराभवानंतर जपानच्या ओसाकाने बदलला आपला मास्तर
तीन मुलांची आई असलेल्या किम क्लाइस्टर्सने WTA मध्ये पुनरागमन करणार असल्याचे जाहीर केले आहे. तिनं सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. २०२० मध्ये होणाऱ्या स्पर्धेत किम भाग घेणार आहे. २००३ मध्ये किमने जागतिक क्रमनारीत पहिले स्थान पटकावले होते. तर, २००५ मध्ये तिने आपले पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते.
'मला काहीही सिद्ध करायचे नाही. पण, एक आव्हान म्हणून मी मैदानात उतरणार आहे', असे किमने म्हटले आहे. २००७ मध्ये गरोदर असताना तिने निवृत्ती घेतली होती. मात्र दोन वर्षांनी पुनरागमन करत तिने २०१० मध्ये यूअस ओपनला गवसणी घातली होती. २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पटकावल्यानंतर तिने परत एकदा निवृत्ती घेतली होती. त्यामुळे मैदानावर परतलेली किम काय जादू करते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.