रोम - स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करत इटालियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. दोन तास ४९ मिनिटे रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात नदालने जोकोव्हिचचा ७-५, १-६, ६-३ अशा फरकाने पराभव केला.
इटालियन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना टेनिस जगतातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये झाला. नदाल आणि जोकोव्हिच यांच्यातील सामना टेनिसप्रेमींसाठी नेहमी एक पर्वणी असतो. चाहत्यांच्या इच्छेप्रमाणे सामना देखील रोमांचक झाला. यात नदालने जोकोव्हिचवर सरसी साधली. विशेष म्हणजे, एक नव्हे, दोन नव्हे तर सहाव्यांदा या दोघांमध्ये इटालियन ओपनचा अंतिम सामना खेळला गेला.
नदालने इटालियन स्पर्धेची १२व्यांदा वेळी अंतिम फेरी गाठली होती आणि त्याने १०व्यांदा जेतेपदावर नाव कोरले. या विजयासोबत नदालने जोकोविचच्या ३६ एटीपी मास्टर्स १००० विजेतेपदाशी बरोबरी साधली.