लंडन - भारतीय टेनिसपटू अंकिता रैना विम्बल्डन महिला एकेरीच्या मुख्य ड्रा मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरली. तिला क्वालिफायरच्या पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावं लागलं.
अंकिता रैनाचा अमेरिकेच्या वारवरा लेपचेंको हिने ६-३, ७-६ असा पराभव केला. पहिल्या सेट गमावल्यानंतर अंकिताने दुसऱ्या सेटमध्ये कडवी झुंज दिली. परंतु लेपचेंको हिने ट्रायब्रेकमध्ये हा सेट ७-६ ने जिंकत सामना आपल्या नावे केला.
जागतिक क्रमवारीत १८२ स्थानावर असलेल्या अंकिताला सामन्यात फक्त एक ब्रेक पाईंट मिळाला. त्या संधीचे तिला सोनं करता आलं नाही.
पुरूष एकेरीत रामनाथन दुसऱ्या फेरीत
पुरुष एकेरीच्या क्लालिफायरमध्ये भारताचा रामकुमार रामनाथन दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे. तर प्रजनेश गुणेश्वरला पराभवाचा धक्का बसला आणि त्याचे आव्हान संपुष्टात आले.
२ दिग्गज टेनिसपटूंची ऑलिम्पिकमधून माघार
राफेल नदाल पाठोपाठ आणखी दोन स्टार टेनिसपटूंनी टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेयाचा टेनिसपटू डोमिनिक थीमने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याने आपण या स्पर्धेसाठी तयार नाही. सध्या मला विम्बल्डन स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे कारण दिलं आहे. थीमनंतर काही तासांतच कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शापोवालोवने आपण ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. त्याने, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे ट्विट करत सांगितलं आहे.
नदालची माघार...
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने टोकियो ऑलिम्पिक आणि विम्बलडनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेनंतर ऑलिम्पिक स्पर्धांसाठी जास्त वेळ नसल्याने फिटनेसचे कारण देत नदालने माघार घेतली. याबाबत त्याने ट्विट करत सांगितलं होतं.
हेही वाचा -Tokyo Olympics : नदालनंतर आणखी २ दिग्गज टेनिसपटूंची ऑलिम्पिकमधून माघार, दिलं 'हे' कारण
हेही वाचा -मोठी बातमी, नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार