लंडन - टेनिस विश्वात भारतीय वंशाच्या आणखी एक खेळाडूने आपला झेंडा रोवला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी समीर बनर्जी याने शानदार प्रदर्शन करत ज्यूनिअर विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. समीरने अंतिम सामन्यात विक्टर लिलोव याचा पराभव केला. समीरने अमेरिकेच्याच विक्टरचा ७-५, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ज्यूनिअर विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले.
समीर एकतर्फा सामन्यात आपल्याच देशाच्या विक्टरवर भारी पडला. विक्टरने काही काळ समीरसमोर कडवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण निर्णायक क्षणात समीरने वेगाने सर्विस करत तसेच रिटर्न शॉट मारत पहिला सेट ७-५ असा जिंकला. पहिल्या सेट गमावल्याचा परिणाम विक्टरवर पडला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये अनेक चूका केल्या. या फायदा उचलत समीरने हा सेट ६-३ असा जिंकत विजेतेपद पटकावले.
अॅश्ले बार्टी विम्बल्डनची नवी 'राणी'
अग्रमानांकित अॅश्ले बार्टीने विम्बल्डन २०२१ सालच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा पराभव करत विजेतेपद पटकावले. बार्टीने अंतिम सामन्यात कॅरोलिनाचा ६-३, ६-७ (४-७) ६-३ असा पराभव केला. विम्बल्डनला बार्टीच्या रुपाने नवा विजेता मिळाला. तर दुसरीकडे कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.