नूर सुलतान (कझाकिस्तान) -भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसने डेव्हिस चषक स्पर्धेतील विजयी फॉर्म कायम राखत दुहेरीतील ४४ वा सामना खिशात घातला आहे. पेसने पदार्पणवीर जीवन नेदुंचेझियानच्या साथीने सामना जिंकत भारताची पाकिस्तानवरची आघाडी वाढवली.
हेही वाचा -'धोनीच्या निवृत्तीवर दादाचं 'मोठं' विधान', म्हणाला..
पाकिस्तानला ४-० ने मात देत भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटाची पात्रता गाठली आहे. दिवसातील पहिल्याच सामन्यात मोहम्मद शोएब आणि हुफैजा अब्दुल रहमानची जोडी पेस आणि जीवनसमोर टिकू शकली नाही. पेस-जीवनने अवघ्या ५३ मिनिटांत ६-१, ६-३ ने पाकच्या खेळाडूंना धूळ चारली. तर, एकेरीच्या सामन्यात सुमित नागलने युसफ खलिलला ६-१, ६-० असे पछाडले.
६ आणि ७ मार्च २०२० ला भारत क्रोएशियाविरुद्ध जागतिक गटाची पात्रता लढत खेळणार आहे. या पात्रता फेरीत २४ संघांचा समावेश असून, त्यापैकी १२ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पेसने या स्पर्धेत ४४ व्या विजयाची नोंदल करत इटलीच्या निकोला पीट्रँगेलीचा ४२ विजयांचा विक्रम मोडीत काढला. पेसने ५७ सामन्यांत ४४ तर, पीट्रँगेलीने ६६ सामन्यांत ४२ विजय मिळवले होते.