पॅरिस - लाल मातीच्या कोर्टवरील आपली एकाधिकारशाही स्पेनच्या राफेल नदालने रविवारी पुन्हा दाखवून दिली. त्याने सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला तीन सेटमध्ये पराभूत करत फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे ऐतिहासिक १३ वे फ्रेंच ओपन विजेतेपद ठरले. या विजेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील विक्रमी २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरीसुद्धा साधली आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि दुसऱ्या मानांकित राफेल नदाल यांच्यातील लढत रंगतदार होईल अशी आपेक्षा व्यक्त होत होती. पण नदालने ती फोल ठरवली. त्याने लाल मातीचा बादशाह आपणच असल्याचे दाखवून दिले. पहिले दोन सेट तर नदालने ६-०, ६-२ असे सहज जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने थोडाफार प्रतिकार केला. जोकोव्हिच तिसऱ्या सेटमध्ये ५-४ या आघाडीवर होता. मात्र तेथून सलग तीन गेम जिंकत नदालने जोकोव्हिचचा प्रतिकार मोडून काढला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.