पॅरिस -पोलंडची युवा टेनिसपटू इगा स्वियातेक हिने फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या सामन्यात १९ वर्षीय इगाने अमेरिकेच्या सोफिया केनिनचा सलग दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. इगाचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम आहे. तसेच इगा ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरणारी पोलंडची पहिली टेनिसपटू ठरली.
इगाने अंतिम सामन्यात केनिनवर ६-४, ६-१ अशी मात केली. या वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या केनिनकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. पण सुरुवातीचा काही खेळ वगळता इगाचेच संपूर्ण सामन्यात वर्चस्व दिसले. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात अवघे २३ गेम गमावणाऱ्या इगाने केनिनविरुद्ध सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले.