पॅरिस - फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. दरवर्षी मे महिन्यामध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सप्टेंबरमध्ये होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, ही स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. पण, मोजकेच प्रेक्षक मैदानावर सामना पाहू शकणार आहेत. दरम्यान, महिना बदलल्याने थंड वातावरणात सुरू होणाऱ्या या लाल मातीवरील स्पर्धेत नवा अनुभव पाहायला मिळणार आहे.
आजपासून सुरू होणारी ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९८१ मध्ये फ्रेंच क्ले कोर्ट चॅम्पियनशीप या नावाने करण्यात आली होती. लाल मातीवरील 'बादशाह' अशी ओळख असलेल्या स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने तब्बल १२ वेळ ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत नदालला अग्रमानांकित सर्बियाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय या दोघांना गेल्या दोन फ्रेंच स्पर्धामध्ये उपविजेतेपद मिळवणारा ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिमचे कडवे आव्हान आहे.