नवी दिल्ली - स्वीत्झर्लंडचा स्टार खेळाडू रॉजर फेडररने मियामी ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. तिसऱ्या फेरीत त्याने 103 व्या मानांकित सर्बियाच्या फिलिप क्रॅन्झिओकचा 7-5, 6-3 ने पराभव केला. फेडररचा पुढील सामना १५ व्या मानांकित रशियाच्या डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे.मियामी ओपनच्या तिसऱया फेरीत स्पेनच्या डेव्हीड फेररला ३४ व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सीस ताईफोईने ५-७, ६-३, ६-३ ने पराभूत केले. ताईफोईचा पुढचा सामना २० व्या मानांकित बेलारूसच्या डेव्हिड गोफिनविरूद्ध होणार आहे.
फेडररने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिले दोन्ही सेट जिंकत सामना सरळ सेटमध्ये जिंकला. नुकत्याच झालेल्या इंडियन वेल्सच्या अंतिम फेरीत फेडररला ४ थ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डोमॅनिक थीमकडून ३-६, ६-३, ७-५ ने पराभव पत्करावा लागला होता. या वर्षातील फेडररचा खेळ पाहता तो १०१ वा एटीपी किताब जिंकेल यात शंका नाही. अमेरिकेच्या जिमी कॉनर्सने १०९ एटीपी किताब जिंकले आहेत. कॉनर्सनंतर १०० एटीपी किताब जिंकणारा फेडरर जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे. क्ले कोर्टचा बादशाह स्पेनच्या राफेल नदालने नुकताच झालेल्या इंडियन वेल्स ओपनच्या उपांत्य फेरीतून दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यामुळे नदाल या स्पर्धेतून माघार घेतली आहे.