नवी दिल्ली -टेनिसचा महानायक रॉजर फेडररच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेडररच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडच्या स्वीसमिंटने आपल्या प्रतिमेसह २० फ्रँक सिल्व्हर नाणे तयार केले आहे. जिवंत व्यक्तीच्या सन्मानार्थ स्वीसमिंटने चांदीचा नाणे तयार करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरली आहे.
हेही वाचा -मेस्सीचं धूमशान...सहाव्यांदा पटकावला ‘बलोन डी ओर’ पुरस्कार
'स्वीसमिंटचे हे नाणे फेडररला समर्पित करते. इतिहासामध्ये प्रथमच घडत आहे जेव्हा एखाद्या जिवंत व्यक्तीच्या नावावर नाणी देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे', असे स्वीसमिंटने म्हटले आहे. या सन्मानार्थ फेडररने स्वीसमिंटचे ट्विटरवरून आभार मानले. 'या भव्य सन्मानाबद्दल स्वित्झर्लंड आणि स्विसमिंटचे धन्यवाद', असे २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररने ट्विटमध्ये म्हटले आहे.
फेडररच्या बॅक हँडचा फोटो असलेली ५५ हजार नाणी बनविली गेली आहेत. स्वीसमिंट येत्या मे महिन्यात ५० फ्रँक नाणी जारी करेल. ३८ वर्षीय फेडरर स्वित्झर्लंडचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम आणि एटीपी मास्टर्स १००० ची २८ विजेतेपदं जिंकली आहेत.