सिडनी - गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये भीषण वणव्याचे तांडव सुरू आहे. देशातील विविध राज्यांमध्ये लागलेल्या या आगींमध्ये आतापर्यंत १,५०० घरे उद्ध्वस्त झाली. तर, लाखो हेक्टर जमीन आगीखाली गेली. या संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रातील लोकांकडून मदत केली जात आहे. टेनिस विश्वातील दोन दिग्गज खेळाडूही मदतीपुढे पुढे सरसावले आहेत.
हेही वाचा -VIDEO : केकेआरमध्ये दाखल झालेल्या खेळाडूने रचला लागोपाठ ५ षटकारांचा विक्रम!
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियात आगीत बाधित झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. रशियाची स्टार महिला टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिच्या विनंतीवरून जोकोविचने आगीत बाधित झालेल्यांसाठी मदत देण्याचे ठरवले.
ऑस्ट्रेलिया बुशफायर रिलीफ फंडासाठी शारापोव्हाने तिच्या वतीने २५ हजार डॉलर्स देण्याचे ठरवले आहे. आणि तिने तितक्याच रकमेसाठी जोकोविचकडे विचारणा केली. 'ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या १५ वर्षांपासून माझे घर आहे. अशा प्रकारे येथील कुटुंबांचा आणि प्राण्यांचा होणारा नाश, हे पाहणे दु:खदायक आहे. मी २५ हजार डॉलर्सची मदत देते. जोकोविच तू माझ्या रकमेएवढी मदत करशील का?', असे शारापोव्हाने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावर जोकोविचनेही शारापोव्हाला आश्वासक उत्तर दिले. 'हो, मारिया. मी २५,००० डॉलर्सची देणगी देईन जी या समुदायांना पाठवली जाईल. ऑस्ट्रेलिया, आम्ही तुमच्या सोबत आहोत', असे जोकोविच म्हटले.
भीषण आगीच्या वणव्यात ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमावावा लागला. न्यू साऊथ वेल्स या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे.