मेलबर्न - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचने थाटात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचने जर्मनीच्या अॅलेक्झाडर ज्वेरेवचा पराभव केला.
तीन तास ३० मिनिटे रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने ज्वेरेवचा ६-७, ६-२, ६-४, ७-६ अशा फरकाने पराभव केला. जोकोव्हिचसमोर उपांत्य फेरीत, पहिलाच ग्रँडस्लॅम खेळणाऱ्या रशियाच्या अस्लन कारात्सेव याचे आव्हान आहे.
पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये गेला. यात ज्वेरेव याने ७-६ अशा फरकाने बाजी मारली. यानंतर जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत पुढील दोन्ही सेट ६-२, ६-४ अशा फरकाने जिंकले. चौथ्या सेटमध्ये ज्वेरेवने ३-० ने आघाडी घेतली. तेव्हा जोकोव्हिचने आक्रमक पावित्रा घेत वेगाने फटके मारले. अखेरीस हा सेट देखील ट्रायब्रेकरमध्ये गेला. तेव्हा जोकोव्हिचने हा सेट ७-६ अशा फरकाने जिंकत उपांत्य फेरी गाठली.