मुंबई- कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. यामुळे दैनंदिन रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अशा कठीण काळात भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने मदतीसाठी हात पुढे केला आहे. रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांसाठी जेवणासह इतर काही जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी ती पुढे सरसावली आहे.
सानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मजुरांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. या संचारबंदीमध्ये रोजंदारीवर असणाऱ्यांना अधिक फटका बसतो आहे. त्यांना काम नसल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे. अशा मजूरांसाठी आपण एकत्र पुढे येऊन त्यांना मदत करण्याचं आवाहन तिने केले आहे.