ऑस्ट्रिया (युरोप) - अमेरिकेची १५ वर्षीय महिला युवा खेळाडू कोको गॉफने आपल्या कारकिर्दीतील पहिले डब्लूटीए स्पर्धा जिंकली. तिने लिंज ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लॅटव्हियाच्या जेलेना ओस्तापेंकोचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.
लिंज ओपन स्पर्धेतील अंतिम सामना १५ वर्षीय कोको गॉफ विरुध्द अनुभवी जेलेना ओस्तापेंको यांच्यात झाला. या सामन्यात कोकोने जेलेनाचा ६-३, १-६, ६-२ ने पराभव केला.
लिंज ओपन स्पर्धेच्या चषकासह कोको गॉफ.... सामन्याचा पहिला सेट कोकोने ६-३ ने जिंकत चांगली सुरूवात केली. मात्र, जेलेनाने त्याला दुसऱ्या सेटमध्ये १-६ ने प्रत्त्युत्तर दिले. तेव्हा सामना निर्णायक सेटमध्ये पोहोचला. या सेटमध्ये कोकोने दमदार खेळ केला आणि फ्रेंच स्पर्धा विजेती जेलेनाचा ६-२ ने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
लॅटव्हियाची जेलेनाने २०१७ मध्ये फ्रेंच स्पर्धेत विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तिचे हे कारकीर्दीतील पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले होते. अशा पराक्रम करणारी ती लॅटव्हियाची पहिलीच खेळाडू ठरली होती. तिने अनुभवी खेळाडू सिमोना हॅलेपवर ४-६, ६-४, ६-३ असा सनसनाटी विजय नोंदवत स्पर्धा जिंकली होती.
यामुळे कोको विरुध्दच्या सामन्यात जेलेनाचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोकोने जेलेनाचा पराभव करत पहिले जेतेपद पटकावले. दरम्यान, यापूर्वी कोकोने यूएस ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. महत्वाचे म्हणजे, तिने आपल्याच देशाच्या व्हीनस विल्यम्सचा पराभव केला होता.
हेही वाचा -फेडररने चाहत्यांच्या विनंतीवर बदलला प्रोफाइल फोटो; तुम्हीही म्हणाल क्या बात!
हेही वाचा -अॅलेक्झँडरचे 'पानिपत' करत मेदवेदेव्हने जिंकली 'शांघाय मास्टर्स स्पर्धा'