नवी दिल्ली -कॅनडाच्या १९ वर्षीय अँड्रेस्क्यु बिआंकाने दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पराभवाचे पाणी पाजत यूएस ओपनच्या जेतेपदावर नाव कोरले. या पराभावामुळे सेरेनाचे २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
हेही वाचा -वॉर्नरची 'भोपळा' हॅट्ट्रीक, स्टुअर्ट ब्रॉडने केली सहाव्यांदा शिकार
या महामुकाबल्यात बिआंकाने सेरेनाला ६-३, ७-५ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. बिआंका ही कॅनडाकडून ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. शिवाय ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ती युवा खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे, १९९९ मध्ये सेरेनाने जेव्हा आपले पहिले वहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले होते तेव्हा बिआंकाचा जन्मही झाला नव्हता.
'हा विजय शब्दांत सांगणे खरच कठीण आहे. मी खूर परिश्रम घेतले होते. या वर्षी हे स्वप्न सत्यात उतरले. दिग्गज खेळाडू सेरेनाच्या विरुद्ध खेळणे हे खुप मोठेपणाचे आहे. हे सोपे नव्हते. प्रतिस्पर्धी खेळाडूचा मी विचार नाही केला. मी स्वत:ला उत्कृष्ट बनवण्यासाठी मेहनत घेतली', असे बिआंकाने विजयानंतर सांगितले.
तर, ३७ वर्षीय सेरेनाने युवा बिआंकाचे कौतुक केले आहे. ती म्हणाली,'बिआंकाने अविश्वसनीय सामना खेळला. मला तिचा अभिमान आहे'.