मेलबर्न - अमेरिकेची दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने आज (मंगळवार) ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरीत धडक मारली. तिने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित सिमोना हालेपचा ६-३, ६-३ ने पराभव करत थाटात उपांत्य फेरी गाठली.
सेरेनाने २०१७ साली ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते. त्यानंतर तिला प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली आहे. तिचा उपांत्य फेरीत सामना जपानच्या नाओमी ओसाका हिच्याशी होणार आहे. सेरेना आपल्या २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून दोन पाऊल दूर आहे.
उपांत्यपूर्व सामन्यातील पहिल्या सेटमध्ये हालेप सेरेनासमोर आव्हान उभारू शकली नाही. सेरेनाने हा सेट ६-३ अशा फरकाने सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये हालेपने ३-१ ने मुसंडी मारली. यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता वाटत होती. पण, सेरेनाने सलग पाच पॉईंट घेत सेटसह सामन्यात विजय मिळवला.