मेलबर्न - सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपनची सुरूवात धडाक्यात केली. त्याने वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा पहिला सामना सहज जिंकला. पहिल्या फेरीत त्याने फ्रान्सच्या जेरेमी चार्डी याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत थाटात प्रवेश केला.
जोकोव्हिचने १ तास ३१ मिनिटे रंगलेल्या सामन्यात चार्डीचा ६-३, ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यात जोकोव्हिचने निर्विवाद वर्चस्व राखले.
जोकोव्हिचचा दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफो यांच्याशी सामना होणार आहे. टियाफो याने पहिल्या फेरीत इटलीच्या स्टेफानो त्रावागलिया याचा ७-६, ६-२, ६-२ ने पराभव केला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत, ऑस्ट्रेयाच्या डोमिनिक थीम, जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेक आणि स्वीत्झरलँडचा स्टान वावरिका यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे.
थीमने पहिल्या फेरीत कझाखस्थानच्या मिखाइल कुकुशकिन याचा दोन तास ४० मिनिटे रंगलेल्या सामन्यात ७-६, ६-२, ६-३ असा पराभव केला. तर ज्वेरेक याने अमेरिकेच्या मारकोस गिरोन याच्याविरुद्ध ६-७, ७-६, ६-३, ६-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
हेही वाचा -Australia Open: अंकिताने रचला इतिहास; ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवणारी ठरली पाचवी भारतीय
हेही वाचा -आजपासून रंगणार वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा थरार!