मेलबर्न - अमेरिकेची जेनिफर ब्रॅडीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवा हिचा तीन सेटमध्ये पराभव केला.
ब्रॅडी-मुचोवा यांच्यातील सामना रंगतदार झाला. एक तास ५५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ब्रॅडीने ६-४, ३-६, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला. पहिला सेट ब्रॅडीने ६-४ अशा फरकाने जिंकला. तेव्हा मुचोवा हिने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केले. तिने दुसरा सेट ६-३ ने जिंकत सामना बरोबरीत आणला. पण निर्णायक सेटमध्ये जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या ब्रॅडीने ६-४ अशी बाजी मारत अंतिम फेरीत धडक दिली.