मेलबर्न - सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने रविवारी रशियाच्या डेनिल मेदवेदेवचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम पुरूष एकेरीच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. १८वे ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोव्हिचचे हे विक्रमी नववे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद ठरले हे विशेष. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. जोकोव्हिचचे हे सलग तिसरे विजतेपद ठरले.
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोव्हिचने जेतेपदाच्या लढतीत चौथ्या मानांकित डेनिल मेदवेदेवचा ७-५, ६-२, ६-२ अशा फरकाने अगदी सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम लढत रोमहर्षक होईल, अशी आशा बाळगणाऱ्या टेनिसप्रेमींच्या आशांना सुरूंग लागला. जोकोव्हिचच्या झंझावती खेळासमोर पहिला सेट वगळता मेदवेदेवची डाळ शिजली नाही.
पहिल्या सेटमध्ये मेदवेदेवने थोडाफार प्रतिकार केला. तरीदेखील जोकोव्हिचने हा सेट ७-५ अशा फरकाने जिंकत आपणच 'नंबर वन' असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर दोन्ही सेटमध्ये मेदवेदेवचा सरळ धुव्वा उडवत जोकोव्हिचने झळाळता करंडक पटकावला.
मेदवेदेवने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. पण त्याला जेतेपद पटकावता आले नाही. तो दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी २०१९ मध्ये त्याने यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. तिथेही त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली होती.