मेलबर्न- ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या ११ दिवशी महिला एकेरीत उलटफेर पाहायला मिळाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अॅश्ले बार्टीला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या सोफिया केनिनने बार्टीला ७-६, ७-५ अशी धूळ चारली. या पराभवाबरोबर बार्टीचे २०२० या वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी आणि सोफिया केनिन यांच्यात १ तास ४५ मिनिटे लढत रंगली. यात सोफियाने पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. बार्टी दुसऱ्या सेटमध्ये उलटफेर करेल, अशी आशा होती. पण, सोफियाच्या आक्रमक खेळासमोर ती हतबल ठरली. दुसरा सेट सोफियाने ७-५ असा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. सोफियाने पहिल्यादांच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.