मेलबर्न - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात फेडररने आपला अनुभव पणाला लावत २८ वर्षीय टेनिस सँडग्रेनला धूळ चारली. साडेतीन तास रंगलेल्या सामन्यात फेडररने १-२ अशा पिछाडीवरून ६-३, २-६, २-६, ७-६ (१०-८), ६-३ अशी बाजी मारली.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. पण, त्यानंतर अमेरिकेच्या खेळाडूने जबरदस्त कमबॅक केला. त्याने पुढील दोनही सेट २-६, २-६ अशा फरकाने जिंकले.
चौथा सेट चुरशीचा ठरला. टाय ब्रेकरमध्ये झालेल्या या सेटमध्ये फेडरर ३-६ असा पिछाडीवर होता. पण त्याने अचानक मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला. त्याने आपला अनुभव पणाला लावताना टाय ब्रेकरचा सेट ६-६ असा बरोबरीत आणला आणि त्यानंतर तो १०-८ असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली.