मेलबर्न- ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिचने जपानच्या तस्तुमा इटो याचा ६-१, ६-४, ६-२ ने धुव्वा उडवत तिसरी फेरी गाठली. तर दुसरीकडे महिला एकेरीत अमेरिकेची १५ वर्षीय खेळाडू कोको गॉफने रोमानियाच्या सोराना क्रिस्टिया हिला धूळ चारली.
१४५ व्या स्थानावर असलेल्या जपानच्या तस्तुमा इटो याने भारताच्या प्रजनेश गुणेश्वरनला धूळ चारत दुसरी फेरी गाठली होती. मात्र, त्याचा सामना दिग्गज नोव्हाक जोकोव्हिचशी झाला. तेव्हा जोकोव्हिचने त्याला ६-१, ६-४, ६-२ सरळ सेटमध्ये मात दिली.
जोकोव्हिचने पहिला सेट एकतर्फा जिंकला. त्यानंतर इटोने दुसऱ्या सेटमध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोकोव्हिचच्या वेगवान सर्विससमोर इटो हतबल ठरला आणि दुसरा सेटही तो ४-६ ने पराभूत झाला. जोकोव्हिचने अखेरच्या सेटमध्येही आपल्या वेगवान सर्विसच्या जोरावर इटोला मात दिली.